बीएसएनएल




‎"हॅलो, बीएसएनएल का ? "
" हो, बोला "
" अहो ब्रॉडबँड बंद पडलेय "
" तुमचंच नाही, सगळीकडेच बंद आहे"
" का हो ? "
" टेक्निकल प्रॉब्लेम" खाSSड फोन बंद
*****

" हॅलो, बीएसएनएल ? "
" दोन दिवस झाले नेट बंद आहे हो, कामं अडलीयेत "
" काय करू साहेब ? सगळ्यांची तीच बोंब आहे"
" नक्की काय प्रॉब्लेम आहे हो ? "
" एक्चेंजमधे उंदराने केबल खाल्ल्यात "
" काय सांगता ? तरी किती वेळ लागेल चालू व्हायला ? "
" काही सांगता येत नाही केबल शोधायला वेळ जाणारच " खाSSड फोन बंद
*****

"हॅलो बीएसएनएल ?"
" बोला "
" तुमच्या एक्चेंजमधे प्रॉब्लेम आहे ना "
" हो ना साहेब, केबल खाल्ल्या उंदरांनी "
" मी तुमची काही मदत करू शकतो का ? "
" तुम्ही टेलिकॉम वाले का हो ? "
" नाही, पण मी थोडं सुचवू शकतो "
" सांगा की साहेब "
" तुम्ही ना ! चार-पाच मांजरी पाळा वाटल्यास मी एक देतो.... फुकटात "
खाSSड फोन बंद
*****

"हॅलो बीएसएनएल ? "
" बोला "
" अहो मघाशी फोन केलेला मी ते मांजरीचं तेवढं ..."
" अहो साहेब कशाला मस्करी करता ? मांजरी पाळल्यानं काय होणार आहे ? "
" अहो त्या उंदीर खातील ना ! त्या काही केबल खात नाहीत "
" आणि मग मांजरी बाहेर कशा काढायच्या ? "
" कुत्रे देतो ना दोन, चांगले गलेलठ्ठ "
"च्यायला...... "खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" हे बघा तुम्हीपण मांजर पाळायचे सल्ले देणार असाल तर.... "
" नाही हो, कुणी दिला होता का असला सल्ला ? "
" नायतर काय साहेब, इथे आमची हालत झालेय आणि लोकांना मस्करी सुचते"
" तुम्ही सध्या काय प्रोटेक्शन घेताय ? "
" आँ, कसलं ओ कसलं ? "
" अहो एक्स्चेंज साठी म्हणतोय मी "
" चालू आहेत प्रयत्न "
" मी सर्व्हिस देऊ का ? "
" काय करता आपण ? टेलिकॉम मध्ये आहात का ? "
" नाही हो, सर्पमित्र आहे " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल का ? "
" तुम्हीपण सर्पमित्र आहात का ? "
" का ? तुम्ही आहात ? "
" नाही हो, मघाशी कुणीतरी त्रास देत होतं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे ? "
" अहो नेट बंद आहे गेले चार दिवस "
" एक्सचेंजमध्ये उंदरांनी वायर चावल्यानं बंद पडलंय ते, काम चालू आहे"
" पण मी काय म्हणतो, "
" बोला "
" तुम्ही केबलना उंदराचं औषध लावून ठेवा म्हणजे बघा की उंदीर पडलेला असेल तिथेच शोधायची केबल "
" तुम्ही तेच कालचे का हो ? "
" नाही मी उंदीर मारायचं औषध विकतो एकदम जहाल आहे बघा उंदीर फूटभर पण लांब जाऊ शकत नाही "
" ....... " खाSSड फोन बंद
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" नेट चालू झालेय "
" मी विचारत होतो तुमच्याकडे एखादी कादंबरी किंवा डीव्हीडी आहे का हो ? "
" हे टेलिफोन एक्सचेंज आहे लायब्ररी नाही "
" नाही त्याचं काय आहे ते नेट ..... "
" सांगितलं ना चालू झालंय "
" हो तेच ते पण ते किंचित स्लो आहे, मला एक मेल पाठवायचंय तर ते लिहून पूर्णं होईपर्यंत तेवढाच टाईमपास एखादी कादंबरी वाचून झाली असती हो "
" आयची.... "
*****

" हॅलो बीएसएनएल ? "
" आता नेट व्यवस्थित चालू आहे "
" ते माहीताय मला पण.. "
" पण काय ? "
" तेवढा उंदीर सापडला का ते विचारायचं होतं "

हल्ली म्हणे बीएसएनएल त्या कॉलरला शोधतायत म्हणे, त्याचं कनेक्शन बंद करण्यासाठी. मला भीती नाही मी बरेच जणांचे फोन वापरलेत.
.......source internet

Marathi Abhiman Geet

मराठी अभिमान गीत.........


लाभले  आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी