शिक्षक दिन....



सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला करायचे असते. ..

गुरुच्या अस्तित्वाशिवाय मुलांच्या बालजीवनाला पूर्णता येत नाही. 'छडी लागे छम् छम्, विद्या येई घम् घम्,' असे म्हटले जाई. किंबहूना, जुने गुरुजन ती पद्धत सर्रासपणे वापरीत. पण, आज छडी गायब झाली आहे. हा काळाचा महिमा आहे. शिस्त ही गोष्ट विद्यार्थ्यांना अडसर वाटतो, पण वास्तवात ती पतंगाच्या दोरीसारखी असते. पतंगाने आकाशात वरवर झेप घ्यावी, म्हणून दोरीने त्याला मागे मागे खेचले जाते. तीच दोरी कापली तर पतंग जमिनीवर येऊन फतकल मारतो. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेत असताना, शिक्षकांनीदेखील ध्यानात ठेवायचे असते की शिस्त ही तंबोऱ्याच्या तारांसारखी असते. तारा सैल ठेवल्या तर त्यातून सूर बेसूर निघतात अन् जास्त आवळल्या तर तुटतात. गुरु-शिष्याचे अनमोल नाते अशा मुल्यांनी आणि दक्षतांनी फुलत राहते.........!!!

माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....

माणसं भेटतात...प्रसंग आठवतात....
मनात भावनांची गर्दी झाली कि शब्द अबोल होतात,
बुद्धी परकी होते....फक्त आपल्यासाठी का होईना काळाचं चक्र थांबतं...

खूप काही बोलायचं असतं, पण नेमक्या शब्दात मांडणं कठीण होऊन जातं.
काय सांगावं,कसं सांगावं, काय आधी सांगावं, सांगितलंच पाहिजे का...?
हे विचार करता करता सगळंच सांगायचं राहतं.

युद्धभूमीवर सामान्य सैन्य पुढे करून राजाने मागून सगळं रणांगण पहावं तसं
शब्दांच्या गिचमिडीत नेमके हवे तेच शब्द मागे राहतात...
मग जाणवतं कि,
जे शब्द ओठातून निसटतात...ते अगदी शुल्लक असतात.....
जे लपून राहतात....ते खरे योद्धे असतात...त्यांनी लढायला हवं होतं...

घुमटामध्ये आवाज घुमतो...प्रतिध्वनी ऐकू येतो....पण....
घुमट समजून खुल्या आभाळाखाली जोरात किंकाळी मारून प्रतिध्वनीची वाट पाहण्यात काही अर्थ नसतो,
आपलाच आवाज आपल्याला परत ऐकू येत नाही.....
येईलच कसा....?
परत यायला आवाजही आभाळाच्या संपण्याची वाट पाहत धावत असतो....पण आभाळ संपतच नाही....
आभाळ हि अनंताकडे स्वतःचा अंत मागत असतं......
आवाज काही परत येत नाही....आणि....वाट पाहणाऱ्याची वाट पाहणं हि संपत नाही.....
मग एकटेपणाशी भेट होते.....

"वर्तमानात आवडत्या माणसाला वेळ नाही दिला कि,भविष्यातला बराचसा वेळ एकटेपणाला द्यावा लागतो...सो आज जी माणसे भेटल़ी त्यांना सर्वाना धन्यवाद.......