कोल्हापूरच्या तरुण मंडळांची नावंसुद्धा भन्नाट आहेत. झाड ग्रुप, कलकल तरुण मंडळ, अचानक मित्र मंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ, पॉवरफुल्ल चिक्कू मित्रमंडळ...! यावर रिसर्च करणं आवश्यक आहे. रिक्षाच्या मागील बाजूस किंवा मडफ्लॅपवर लिहिलेला मजकूरसुद्धा असाच अभ्यास करण्यासारखा. "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय वाघानं', "तशी मी गावायची नाय,' वगैरे... हे सुचतं कसं, यापेक्षा ही या गावाची ओळख बनत गेली आहे, हे महत्त्वाचं! चेष्टामस्करीलासुद्धा एक खुलेपणा असावा लागतो. तो इथं आहे. इथं अनेक "टर्मा'ही (टर्म) तयार झाल्या आहेत. उदा. रंगाखुष, पाला झाला, हारकुन टुम्म! चेष्टा कुठं करावी यालाही इथं मर्यादा नाहीत. एखाद्या अंत्ययात्रेत प्रेताला खांदा दिलेला समोरून येणाऱ्याला इथे सहज विचारून जातो, ""काय, बसणार काय डब्बलशीट?'' खऱ्या अर्थानं हे सारं आघळपघळ.