आठवणीतलं कोल्हापूर. भिशी_फुटते_तेव्हा..

"उद्या संध्याकाळी भिशीमंडळाची भिशी फुटणार आहे. सर्व सभासदांनी भिशी नेण्यासाठी उपस्थित रहावे", गल्लीतल्या वार्ताफलकावर लिहिलेली ही माहीती वाचली आणि मन अलगद भूतकाळात गेले. कोल्हापुरात अशी भिशीमंडळे एक समांतर अर्थव्यवस्था मजबूत करत होती. शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये टेबल खुर्ची मांडलेली असायची. भोवतीने मस्तपैकी रांगोळी काढलेली असे. टेबलावर भिशीचं रजिस्टर, पेन, भिशीची पाकिटे असा जामानिमा असे. टेपरेकॉर्डरवर मिथूनची डान्सवाली गाणी वाजत असत. लोकं येतील तसतसे भिशीचं वाटप होई. भिशी फुटली की नोटांची थप्पी असलेलं पाकीट खिशात घालायचं. पाकिटावर मुद्दल, व्याज आणि एकूण रक्कम लिहलेली असे. मग खिसा चाचपत चाचपतच दिवाळी खरेदी उत्साहानं पार पडायची.

पुर्वी बँकांत सेव्हिंग करण्यापेक्षा खाजगी भिश्यांमध्ये पैसे साठवणं सोपं वाटण्याचा तो काळ होता. महिन्याच्या कमाईतून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. बचतीची सवयही होवून जाई. गल्लोगल्ली असलेल्या ओळखीच्या भिशीमंडळात दर महिन्याला थोडी बचत करुन दर महिना पन्नास, शंभर अशी रक्कम भरायची. वर्षानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या काही दिवस आधी ही भिशी फोडली जाई. दर महिन्याला थोडी बचत करुन भिशीत साठविलेले पैसे ऐन सणाच्या काळात भिशी फुटल्याने हातात खुळखुळत. त्यानंतरच दिवाळी सणाच्या खरेदीची लगबग सुरु व्हायची. त्याशिवाय कुणाच्या हातात एरवी पैसाच राहत नसे. महाद्वार रोड, राजारामपुरीतली कपड्यांची, विविध साहित्याची दुकाने या भिश्या फुटल्यावर ग्राहकांनी फुलून जात.
सबंध शहरात भिशीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आली आहे. अपवाद वगळता भिशीचालकांबद्दल वर्षानुवर्षे विश्वासाचे नाते असल्याने या भिशींचे जाळे गल्लोगल्ली दिसायचे. काही ठिकाणी बोफोर्स होई तो भाग वेगळा. कधीकधी कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेत भरत नसत. ही वसुली अवघड जागेचं दुखणं होवून बसे. मग भिशीचं पैसे सभासदांना ठरलेल्या वेळी परत करताना संचालकांच्या नाकीनऊ येई. पुढे बचत गटांच्या वर्गणीच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागली. महापालिकेची इलेक्शन आली की, गल्लोगल्ली बचत गट स्थापन होतात. नंतर बंदही पडतात. महिना शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत वर्गणी घेऊन महिन्याला जमा होणाऱ्या रक्कमेतून गरजू लोकांना कर्जही दोन तीन टक्के व्याजदराने सभासदांना दिले जाते.
भिशीमंडळ आणि बचतगटांकडून सभासदांना वर्षभर जमा केलेल्या रक्कमेवर आकर्षक व्याज, मोती साबण, तेल, सुगंधी उटणे अशा भेटवस्तूही दिल्या जात. मोठमोठ्या बँका दारात उभं करून घेत नसत तेव्हा अर्ध्या रात्रीही भिशीचे चालक केवळ विश्वासावर कर्ज देत. त्यासाठी कागदपत्रांची कटकट नसे. काही तासांतच अडीनडीला कर्ज उपलब्ध झाल्यामुळे या वार्षिक भिशीचा मोठा आधार मिळायचा. त्यामुळेही भिशीचा सभासदांची अधिक पसंती असे. काही भिशीवाले फराळाचेही कुपन देतात.
याशिवाय सुवर्णभिशी हा एक वेगळा प्रकार कोल्हापुरात पहायला मिळतो. बारा महिन्यांपैकी शेवटचा एक हप्ता सोन्याची भिशी चालवणाऱ्या सोनाराकडून भरला जातो. शिवाय सोन्याचा दागिना तयार करायचा झाल्यास सभासदांकडून मजुरी घेतली जात नाही. एकदम सोने घेणं शक्य नसलेल्या लोकांना सुवर्णभिशीमुळे थोडे थोडे करुन दागिने तयार करता येतात.
दर महिन्याला भिशी गोळा करायला एखाद्या ठिकाणी टेबल टाकून रजिस्टर ठेवले जाते. एखादा कार्यकर्ता ही भिशी गोळा करून तिचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवतो. ही भिशी फुटते तेव्हा, भिशीच्या ऑफिसात भिशीची पाकीटं तयार करून ठेवलेली असतात. मेंबर्स येतील तसं त्यांची त्यांची पाकीटं देऊन नोंद करून ठेवली जाते. या भिशीच्या सभासदांची दोन तीन महिन्यातून रस्सामंडळ आयोजित केले जाते. काही ठिकाणी सहलींचेही आयोजन होते. महिला मंडळाच्या भिशींमध्ये तर रंगांची थीमही असते. प्रत्येक जणीने एकाच रंगाची साडी नेसून भिशीसाठी एकत्र यायचे. दर महिन्याला प्रत्येकीच्या घरी क्रमवार एकत्र येण्यासाठी भिशीमंडळ हे एक निमित्त होते. जमलेले पैसे चिठ्ठी काढून जिचे नाव येईल तिला बिनव्याजी द्यायचे. पुढच्या महिन्यात त्या महिलेला वगळून उरलेल्या सदस्यात भिशीची चिठ्ठी काढायची. अशी ही भिशी फुटली की, मध्यमवर्गीय कुटुंबातील अर्थव्यवस्था मजबूत होते. मंडळी तुम्हीही अशी भिशी भरली असेल ना..