शिवकालीन होन

 




रायगडावरील यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दुर्मिळ असे शिवकालीन होन मिळाले.

होन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी प्रसिद्ध केलेलं सोन्यापासून बनवलेलं चलन होतं.
याबद्दल युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं, 'स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा.'
सौजन्य: युवराज संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर

ग्रेट बाबूराव पेंटर राजाराम महाराजांचं पेंटींग करताना


 

हे भव्य तैलचित्र आजही न्यू पॅलेस येथे आंत गेल्यावर उजव्या हाताला आहे.... वैशिष्ट्य म्हणजे हे तयार केले खरी काॅर्नर येथील कलामहर्षी बाबुराव पेंटर यांच्या घरी तिसऱ्या मजल्यावर.कधी गेला तर पहा अतिशय चिंचोळ्या जिन्यातुन आपणच जाणे अवघडच पण जिथं हे पेंटिंग तय्यार झाले तिथुनच कसंबसं तेवढ्याच जाडीची पोकळी तयार करण्यात आली नि तिसऱ्या मजल्यावरून ते खाली उतरून भव्य जाड फ्रेम जोडुन हे राजवाड्यात नेले..

आठवणीतलं कोल्हापूर. भिशी_फुटते_तेव्हा..

"उद्या संध्याकाळी भिशीमंडळाची भिशी फुटणार आहे. सर्व सभासदांनी भिशी नेण्यासाठी उपस्थित रहावे", गल्लीतल्या वार्ताफलकावर लिहिलेली ही माहीती वाचली आणि मन अलगद भूतकाळात गेले. कोल्हापुरात अशी भिशीमंडळे एक समांतर अर्थव्यवस्था मजबूत करत होती. शहरात वेगवेगळ्या चौकांमध्ये टेबल खुर्ची मांडलेली असायची. भोवतीने मस्तपैकी रांगोळी काढलेली असे. टेबलावर भिशीचं रजिस्टर, पेन, भिशीची पाकिटे असा जामानिमा असे. टेपरेकॉर्डरवर मिथूनची डान्सवाली गाणी वाजत असत. लोकं येतील तसतसे भिशीचं वाटप होई. भिशी फुटली की नोटांची थप्पी असलेलं पाकीट खिशात घालायचं. पाकिटावर मुद्दल, व्याज आणि एकूण रक्कम लिहलेली असे. मग खिसा चाचपत चाचपतच दिवाळी खरेदी उत्साहानं पार पडायची.

पुर्वी बँकांत सेव्हिंग करण्यापेक्षा खाजगी भिश्यांमध्ये पैसे साठवणं सोपं वाटण्याचा तो काळ होता. महिन्याच्या कमाईतून थोडे थोडे पैसे बाजूला ठेवायचे. बचतीची सवयही होवून जाई. गल्लोगल्ली असलेल्या ओळखीच्या भिशीमंडळात दर महिन्याला थोडी बचत करुन दर महिना पन्नास, शंभर अशी रक्कम भरायची. वर्षानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा दिवाळीच्या काही दिवस आधी ही भिशी फोडली जाई. दर महिन्याला थोडी बचत करुन भिशीत साठविलेले पैसे ऐन सणाच्या काळात भिशी फुटल्याने हातात खुळखुळत. त्यानंतरच दिवाळी सणाच्या खरेदीची लगबग सुरु व्हायची. त्याशिवाय कुणाच्या हातात एरवी पैसाच राहत नसे. महाद्वार रोड, राजारामपुरीतली कपड्यांची, विविध साहित्याची दुकाने या भिश्या फुटल्यावर ग्राहकांनी फुलून जात.
सबंध शहरात भिशीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत आली आहे. अपवाद वगळता भिशीचालकांबद्दल वर्षानुवर्षे विश्वासाचे नाते असल्याने या भिशींचे जाळे गल्लोगल्ली दिसायचे. काही ठिकाणी बोफोर्स होई तो भाग वेगळा. कधीकधी कर्जदार कर्जाचे हप्ते वेळेत भरत नसत. ही वसुली अवघड जागेचं दुखणं होवून बसे. मग भिशीचं पैसे सभासदांना ठरलेल्या वेळी परत करताना संचालकांच्या नाकीनऊ येई. पुढे बचत गटांच्या वर्गणीच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागली. महापालिकेची इलेक्शन आली की, गल्लोगल्ली बचत गट स्थापन होतात. नंतर बंदही पडतात. महिना शंभर रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत वर्गणी घेऊन महिन्याला जमा होणाऱ्या रक्कमेतून गरजू लोकांना कर्जही दोन तीन टक्के व्याजदराने सभासदांना दिले जाते.
भिशीमंडळ आणि बचतगटांकडून सभासदांना वर्षभर जमा केलेल्या रक्कमेवर आकर्षक व्याज, मोती साबण, तेल, सुगंधी उटणे अशा भेटवस्तूही दिल्या जात. मोठमोठ्या बँका दारात उभं करून घेत नसत तेव्हा अर्ध्या रात्रीही भिशीचे चालक केवळ विश्वासावर कर्ज देत. त्यासाठी कागदपत्रांची कटकट नसे. काही तासांतच अडीनडीला कर्ज उपलब्ध झाल्यामुळे या वार्षिक भिशीचा मोठा आधार मिळायचा. त्यामुळेही भिशीचा सभासदांची अधिक पसंती असे. काही भिशीवाले फराळाचेही कुपन देतात.
याशिवाय सुवर्णभिशी हा एक वेगळा प्रकार कोल्हापुरात पहायला मिळतो. बारा महिन्यांपैकी शेवटचा एक हप्ता सोन्याची भिशी चालवणाऱ्या सोनाराकडून भरला जातो. शिवाय सोन्याचा दागिना तयार करायचा झाल्यास सभासदांकडून मजुरी घेतली जात नाही. एकदम सोने घेणं शक्य नसलेल्या लोकांना सुवर्णभिशीमुळे थोडे थोडे करुन दागिने तयार करता येतात.
दर महिन्याला भिशी गोळा करायला एखाद्या ठिकाणी टेबल टाकून रजिस्टर ठेवले जाते. एखादा कार्यकर्ता ही भिशी गोळा करून तिचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवतो. ही भिशी फुटते तेव्हा, भिशीच्या ऑफिसात भिशीची पाकीटं तयार करून ठेवलेली असतात. मेंबर्स येतील तसं त्यांची त्यांची पाकीटं देऊन नोंद करून ठेवली जाते. या भिशीच्या सभासदांची दोन तीन महिन्यातून रस्सामंडळ आयोजित केले जाते. काही ठिकाणी सहलींचेही आयोजन होते. महिला मंडळाच्या भिशींमध्ये तर रंगांची थीमही असते. प्रत्येक जणीने एकाच रंगाची साडी नेसून भिशीसाठी एकत्र यायचे. दर महिन्याला प्रत्येकीच्या घरी क्रमवार एकत्र येण्यासाठी भिशीमंडळ हे एक निमित्त होते. जमलेले पैसे चिठ्ठी काढून जिचे नाव येईल तिला बिनव्याजी द्यायचे. पुढच्या महिन्यात त्या महिलेला वगळून उरलेल्या सदस्यात भिशीची चिठ्ठी काढायची. अशी ही भिशी फुटली की, मध्यमवर्गीय कुटुंबातील अर्थव्यवस्था मजबूत होते. मंडळी तुम्हीही अशी भिशी भरली असेल ना..

खरंच....येते का हो ?

 

परवा दुकानात लक्ष्मीपूजनाचे पुढे विकत होतो आणि समोर साक्षात लक्ष्मीच.......

कडेवर तान्हं बाळ... उपाशी असावं...
माझ्यासमोर हात पसरून........ स्तब्ध.. उभी...
माझ्या हातात लक्ष्मीपूजनाचा पुडा,
पुडा बाजूला ठेवला आणि तिच्या हातावर पाच रुपये ठेवले.......
अबब.....केवढं मोठ्ठ समाजकार्य ...!
मनातून लाज वाटली......
हल्ली मनातली लाज तोंडावर न दिसण्याचे कसब अंगात आलंय......
पोराला सावरत लक्ष्मी लाखमोलाचा आशीर्वाद पाच रुपयात देऊन गेली......
मी चित्रकार
लाल भडक रंगाच्या साडीत....
बाजूला दोन पांढरे हत्ती.....
हातात गुलाबी कमळाचे फूल ......
अंगावर पिवळे धम्मक दागिने लेऊन कमळाच्या फुलावर बसायचं सोडून ही लक्ष्मी , कडेवर उपाशी तान्हं बाळ, अंगात करड्या रंगाची फाटकी साडी, दोन्ही हात पसरून भीक मागताना दिसली .......
वाईट नाही वाटलं.... लाज वाटली .
समजत असून काही करू शकलो नाही याची ...
विचार करायला किंवा कृती ( ? ) करायला वेळच नव्हता..
लक्ष्मीपूजनाचा दिवस होता ........
दुकानात ही गर्दी......................
संध्याकाळची वेळ....................
बसलो पूजेचे पुढे विकत............
संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी घरात येते...........
........................ असं म्हणतात
खरंच....येते का हो ?


BY RAHUL REPE, KOLHAPUR.

MARATHI KAVITA


 

फोटोग्राफर

 

मोबाईल ने घातला फोटोग्राफर वर घाव

त्यातच खेळला करोनाचा डाव 
किरकोळ कामे झाली हद्दपार 
नसे कोणाला काम
रोज येती नित्य नवे कॅमेरे
व्हा अपडेट मिळतील कामे
ऋण काढून सण साजरे करणे
घेऊन नवे कॅमेरे  तरी 
म्हणती आम्ही रिकामटेकडे 
असेल काही काम तर 
सांगा आम्हा पटकन
ज्युनिअर सिनिअर सगळे बसले 
एका पंक्तीत मागाया काम
मांडेल कैफियत सरकार दरबारी 
फोटोग्राफर असोसिएशन 
जुगारुन असोसिएशन रेट
लावती मनमानी थेट
भरली आपली खळगी दाखवू रूबाब वरती
नसे त्यांच्यात एकी म्हणून मरती उपाशी 
हीच खरी व्यथा आहे एका सच्या फोटोग्राफरची

     सौ. रोहिणी अमोल पराडकर 
           कोल्हापूर 8208890678

पन्हाळा

 



पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.

पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे.
पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रीने विनटलेला असून पावसाळा सोडून इतर ऋतूंत येथील हवा आल्हादकारक असते. पन्हाळा किल्ला केव्हा व कोणी बांधला यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या बांधकामासंबंधी काही दंसकथा प्रचलित आहेत; तथापि कोरीव लेख व करवीर पुराण यांतून पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पर्णाल, पन्नागालय वगैरे नामोल्लेख आढळतात. शिलाहार राजा दुसरा भोज (११७५-१२१२) याची राजधानी येथे होती. त्याने पंधरा किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे. त्यांपैकी पन्हाळा हा एक असावा. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली पन्हाळा होता.
आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कबजा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही वर्षें दिला ; पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता.
पन्हाळ्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. चार दरवाजा, राजवाडा अशा काही वास्तूंचे केवळ पाये वा भग्नावशेष दृष्टोत्पत्तीस येतात. सुस्थितीतील अवशिष्ट वास्तूंत तीन दरवाजा, वाघ दरवाजा ही प्रवेशद्वारे; गंगाकोठी, धर्मकोठी आदी बालेकिल्ल्यातील धान्यकोठारे; सज्जाकोठी, नायकिणीचा (कलावंतिणीचा) सज्जा (जीर्ण वास्तू) या तटबंदीवरील वास्तू ;संभाजी व जिजाबाई मंदिरे, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, सदोबा मुसलमानाचा दर्गा ही धर्मस्थळे आणि शृंगार (अंधार), बाव ही विहीर इ. प्रसिद्ध व कलापूर्ण आहेत. ख्यातनाम संतकवी मोरोपंत यांचा जन्म या स्थळी झाला आणि त्यांचे सुरुवातीचे सु. २४ वर्षांपर्यंतचे वास्तव्य या ठिकाणी होते. सदोबा मुसलमानाच्या दर्म्याप्रीत्यर्थ दरवर्षी येथे उरूस भरतो.
*जय शाहू महाराज*,*जय छत्रपती शिवाजी महाराज*, *जय संभाजी राजे*; *जय राजाराम महाराज*,. *जय महाराणी ताराबाई*.
तबक उद्यान, जवाहरलाल नेहरू उद्यान व नागझरी ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधुनिकीकरण केलेली तीन सुरेख पर्यटन स्थाने आहेत. यांशिवाय येथील माध्यमिक शाळा, ग्रंथालय, सरकारी कार्यालये व रुग्णालय, राष्ट्रीयीकृत बँका व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेली निवासस्थाने आणि आलिशान आहारगृहे स्वच्छता व टापटिपीसाठी ख्यातनाम आहेत.
येथे १९५४ पासून नगरपालिका आहे. महाराष्ट्र शासनाने पन्हाळ्यास गिरिस्थानाचा दर्जा दिल्यापासून शहरात गटारे, डांबरी रस्ते, विहिरी, बागबगीचे, सुटी-निवासस्थाने (हॉलिडे होम्स) वगैरे विविध सुधारणा झपाट्याने झाल्या. पन्हाळ्यावर अनेक चित्रपटनिर्माते, सिनेकलावंत, राजेरजवाडे यांचे टुमदार बंगले आहेत. येथील नयनमनोहर सृष्टिसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू यांचा अनेक चित्रपटनिर्मात्यांनी चित्रपटांत उपयोग केला आहे.
संग्रहित.
सौ निर्मला शिंदे पाटील.
एक्स उप प्राचार्या
लेखिका कवयित्री

photo credit - toufique shaikh. kolhapur.

Kolhapur Photography

Photography work on the Birds by Kolhapur Photography facebook group. 

Check out Awesome Photography work and Images by Kolhapur Photographers.

Kolhapur Photography : BIRDS












.