सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी-- जिल्हाधिकारी



सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा २००३ मधील कलम ४ नुसार,सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे हा दंडनिय अपराध आहे.शासकीय कार्यालयांचा परिसर,शाळा महाविद्यालय विद्यापीठ एस.टी.स्टँण्ड,रेल्वे स्टेशन,पोलीस स्टेशन,सरकारी दवाखाने,सिनेमागृहे,विश्रामगृहे आदि सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान अगर अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार्‍यांवर दंडात्मक व न्यायालयीन कारवाई करावी अशा सुचना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी काल येथे दिल्या.
सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियम आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा २००३ यासंदर्भात कायद्याची प्रभावीपणे व यशवीरित्या अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील केंद्ग व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या प्राधिकृत अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याप्रसंगी ते बोलत होते.
प्रत्येक प्राधिकृत केलेल्या कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयाअंतर्गत असणार्‍या सर्व प्राधिकृत अधिकार्‍यांकडून कारवाई करुन घ्यावयाची आहे.प्रत्येक केंद्ग व राज्य शासकीय कार्यालय हे शासनाच्या निर्णयानुसार कारवाई करण्यासाठी प्राधिकृत असल्याने त्या सर्व कार्यालयातील प्राधिकृत अधिकार्‍यांनी मोहिम राबवावी अशा सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.
प्रारंभी सदस्य सचिव व कोल्हापुरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त,नं.आ.यादव यांनी कायद्याबाबत विस्तृत माहिती दिली.दि. १० जानेवारी ते १६ जानेवारी २०११ या कालावधीमध्ये सदर कायद्याच्या कलम ४ व ६ (ब) नुसार विशेष मोहीम म्हणून प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर राबवण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.तसेच कलम ६ (ब) नुसार शाळा,कॉलेज,विद्यापीठ यासारख्या शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्ड त्रिज्येच्या परिसरात सिगारेट किंवा इतर तंबाखूजन्य उत्पादने विक्री करण्यास बंदी असल्याचे स्पष्ट केले.बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.