पन्हाळा

 



पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान. लोकसंख्या २,२१९ (१९७१). कोल्हापूरच्या वायव्येस सु. १८ किमी. वर कोल्हापूर-रत्नागिरी हसरस्त्याच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या कुशीत एका छोट्याशा पठारावर वसले आहे. त्याची स. स. पासून उंची ८४५ मी. असून थंड हवा व रोगप्रतिबंधक पाणी यांकरिता ते प्रसिद्ध आहे.

पन्हाळ्याचे दोन स्वतंत्र भाग आहेत. एक पन्हाळा किल्ला अथवा हुजूर बाजार आणि दुसरा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला रविवार, मंगळवार, गुरुवार, इब्राहीमपूर हा पेठांचा भाग. किल्ल्याचा परिघ ७.२५ किमी. आहे.
पन्हाळ्याचा एकूण परिसर हिरव्यागार वनश्रीने विनटलेला असून पावसाळा सोडून इतर ऋतूंत येथील हवा आल्हादकारक असते. पन्हाळा किल्ला केव्हा व कोणी बांधला यांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या बांधकामासंबंधी काही दंसकथा प्रचलित आहेत; तथापि कोरीव लेख व करवीर पुराण यांतून पन्हाळ्याचे प्रणलाक, पन्नाळे, पर्णाल, पन्नागालय वगैरे नामोल्लेख आढळतात. शिलाहार राजा दुसरा भोज (११७५-१२१२) याची राजधानी येथे होती. त्याने पंधरा किल्ले बांधले अशी आख्यायिका आहे. त्यांपैकी पन्हाळा हा एक असावा. त्यानंतर यादव, बहमनी राजे, आदिलशाही, मराठे, मोगल व पुन्हा मराठे यांच्या सत्तांखाली पन्हाळा होता.
आदिलशाही काळात किल्ल्याची डागडुजी झाली, तटबंदी व दरवाजेही नवीन बांधण्यात आले. शिवाजी महाराजांनीही किल्ल्यात काही सुधारणा केल्या. शिवाजी महाराजांना सिद्दी जोहारने वेढा दिला तो या किल्ल्यातच आणि महाराजांनी संभाजीस कर्नाटकाचा कारभार करण्यासाठी ठेवले तेही याच किल्ल्यात. ताराबाईने कोल्हापूरची गादी स्थापन केल्यानंतर पन्हाळा ही राजधानी केली. दरम्यान शाहूने काही दिवस पन्हाळ्याचा कबजा घेतला होता. कोल्हापूरचे छत्रपती शहाजी यांच्या वेळी (१८२१-३७) पन्हाळा ब्रिटिशांना काही वर्षें दिला ; पण पुढे स्वातंत्र्यापर्यंत तो कोल्हापूर संस्थानाच्या अखत्यारीत होता.
पन्हाळ्यावरील अनेक ऐतिहासिक वास्तू जमीनदोस्त झाल्या आहेत. चार दरवाजा, राजवाडा अशा काही वास्तूंचे केवळ पाये वा भग्नावशेष दृष्टोत्पत्तीस येतात. सुस्थितीतील अवशिष्ट वास्तूंत तीन दरवाजा, वाघ दरवाजा ही प्रवेशद्वारे; गंगाकोठी, धर्मकोठी आदी बालेकिल्ल्यातील धान्यकोठारे; सज्जाकोठी, नायकिणीचा (कलावंतिणीचा) सज्जा (जीर्ण वास्तू) या तटबंदीवरील वास्तू ;संभाजी व जिजाबाई मंदिरे, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, सदोबा मुसलमानाचा दर्गा ही धर्मस्थळे आणि शृंगार (अंधार), बाव ही विहीर इ. प्रसिद्ध व कलापूर्ण आहेत. ख्यातनाम संतकवी मोरोपंत यांचा जन्म या स्थळी झाला आणि त्यांचे सुरुवातीचे सु. २४ वर्षांपर्यंतचे वास्तव्य या ठिकाणी होते. सदोबा मुसलमानाच्या दर्म्याप्रीत्यर्थ दरवर्षी येथे उरूस भरतो.
*जय शाहू महाराज*,*जय छत्रपती शिवाजी महाराज*, *जय संभाजी राजे*; *जय राजाराम महाराज*,. *जय महाराणी ताराबाई*.
तबक उद्यान, जवाहरलाल नेहरू उद्यान व नागझरी ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधुनिकीकरण केलेली तीन सुरेख पर्यटन स्थाने आहेत. यांशिवाय येथील माध्यमिक शाळा, ग्रंथालय, सरकारी कार्यालये व रुग्णालय, राष्ट्रीयीकृत बँका व आधुनिक सुखसोयींनी सुसज्ज असलेली निवासस्थाने आणि आलिशान आहारगृहे स्वच्छता व टापटिपीसाठी ख्यातनाम आहेत.
येथे १९५४ पासून नगरपालिका आहे. महाराष्ट्र शासनाने पन्हाळ्यास गिरिस्थानाचा दर्जा दिल्यापासून शहरात गटारे, डांबरी रस्ते, विहिरी, बागबगीचे, सुटी-निवासस्थाने (हॉलिडे होम्स) वगैरे विविध सुधारणा झपाट्याने झाल्या. पन्हाळ्यावर अनेक चित्रपटनिर्माते, सिनेकलावंत, राजेरजवाडे यांचे टुमदार बंगले आहेत. येथील नयनमनोहर सृष्टिसौंदर्य व ऐतिहासिक वास्तू यांचा अनेक चित्रपटनिर्मात्यांनी चित्रपटांत उपयोग केला आहे.
संग्रहित.
सौ निर्मला शिंदे पाटील.
एक्स उप प्राचार्या
लेखिका कवयित्री

photo credit - toufique shaikh. kolhapur.