'लखपती माझी कन्या 'अभियानात सहभागी व्हा..! -- जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन



दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय घटकांतील कुटुंबात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलींमागे ६ हजार रुपयांची ठेव जमा करुन लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व सरपंचांना केले आहे

जिल्हा प्रशासनाने सेव्ह द बेबी गर्ल,सायलेंट ऑब्झर्व्हर,लिंगनिदान प्रतिबंध अशा विविध उपक्रमांव्दारे जिल्ह्यातील हजार पुरुषांमागे स्त्रियांचा जन्मदर ८३९ वरुन ८७५ इतका नेण्यात यश मिळविले. या प्रयत्त्नांमुळे व प्रबोधनामुळे पुढील काळात मुलींचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करणे,तीचे शिक्षण करुन तिला स्वावलंबी व सुजाण बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लेक माझी लखपती या सामाजिक अभियानात जिल्ह्र्यातील सर्व सरपंचांनी सहभागी होण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी आवाहन केले आहे.जानेवारीᅠ२०११ पासून दारिद्गय रेषेखालील व मागासवर्गीय कुटुंबात जन्मास येणार्‍या प्रत्येक मुलींमागे दरवर्षी २ हजार रुपयांप्रमाणे ३ वर्षे एकूण ६ हजार रुपये भरले तर बजाज अलायन्स कंपनीतर्फे रुपये ४० हजार रुपयांचे विमा संरक्षण व रुपये ६० हजारांची रक्कम मुलीच्या २१ साव्या वर्षी देता येईल.त्यातून तिचा पुढील शिक्षणाचा व लग्नाचा खर्च गरीब कुटुंबास भागविता येईल. अशा तर्‍हेने गरीब कुटुंबास मदत केली तर ते मुलीच्या जन्माचे निश्चित स्वागत करतील.लिंग निदान करुन मुलीचा गर्भपात करणार नाहीत व तिला किमान १२ वी पर्यंत शिकवू शकतील.यासाठी हे अभियान जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१५ पर्यंत राबवून जिल्ह्यातील स्त्री जन्माचे प्रमाण हजार पुरुषांमागे ९५० पेक्षा जास्त होईल,अशी अपेक्षाही जिल्हाधिकार्‍यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

यासाठी ग्रामसभेची व ग्रामपंचायत सभेची मंजूरी घेऊन प्रत्येक मुलींसाठी ६ हजार रुपये ३ वर्षात जिल्हा प्रशासन ठरवेल त्या कंपनीत गुंतवावे लागणार आहेत. याकरिता ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून ५० हजार रुपयांपर्यंत किंवा (जितकी शक्य आहे तेवढी रक्कम) उपलब्ध करणे,गावातील दुध संस्था,पतसंस्थाकडून रुपये हजार-दोन हजार प्रत्येक जन्मणार्‍या मुलींमागे घेणे,गावातील दानशूर श्रीमंतांकडून देणगी घेणे,त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या नांवे एक वेगळे खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून त्यात प्रत्येक जन्मणार्‍या मुलींमागे ६ हजार रुपये जमा करणे व दरवर्षी २ हजार रुपये कंपनीस चेकने आदा करावेत,अशा मार्गाने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन लखपती माझी कन्या अभियानात सहभागी होणे सहज शक्य आहे.

लखपती माझी कन्या या अभियानात सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन करुन जिल्हाधिकार्‍यांनी डिसेंबर अखेर अभियानात सहभागी होण्याबाबत ठराव करुन तो ठराव गावातील तलाठयाकडे द्यावा,असे सरपंचांना पत्राव्दारे कळविले आहे.
savethebabygirl