शाहू स्मारकाच्या निमित्ताने....


विकासाचे मोजमाप भौतिक विकासावर होत नसते. उंच इमारती, उड्डाणपूलं, उद्योगधंदे यासारख्या भौतिक विकासातून माणसाचा जीवनस्तर किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत असते परंतू अशा विकासाला सर्वांगिण विकास म्हणता येणार नाही. जीवनाचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच समाजात सांस्कृतिक मुल्यांची देवाणघेवाण कशा पध्दतीने होत आहे ? सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नातून समाज जीवन समृध्द होत आहे की नाही हे तपासणे महत्वाचे आहे. सांस्कृतिक संवर्धनासाठी व्यासपीठ निर्माण करुन कला, साहित्य व संस्कृतीला उत्तेजन देणं ही पुढारलेल्या समाजाची लक्षणे आहेत. हातात महागडा मोबाईल, महागडी कार आणि छानशा अपार्टमेंटमध्ये राहण्यास माणूस समाजाशी जुळलेला असतोच असे नाही किंवा त्याच सांस्कृतिक विकास झाला आहे असेही म्हणता येत नाही. समाजातील प्रत्येक घटकाला सर्वांगीण विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम हे सांस्कृतिक विकासाच्या माध्यमातून होत असते, म्हणूनच सांस्कृतिक धोरणाची गरज आहे. राज्य शासनाने राज्याच्या औद्योगिक प्रगतीएवढेच महत्व सांस्कृतिक धोरणाला दिले आहे. राज्यातल्या गावा-गावात,वाड्या-वस्त्यांवर राहणार्‍या समाजाला एकसंघ ठेवण्याचे माध्यम म्हणजे सांस्कृतिक विकास होय. कला, साहित्य आणि संस्कृती यातून माणसाची जडणघडण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
कोल्हपूर म्हणजे खर्‍या अर्थाने कलापूर होय. इथली प्रत्येक गोष्ट प्रत्येक हालचाल ही कलेशी जोडली गेली आहे. आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली अस्सल मराठी ओळख कोल्हापुराने कधीही विसरली नाही. इथली सांस्कृतिक चळवळ आजही इतरांच्या आकर्षणाचा विषय आहे. पुण्यात आय. टी. कल्चर रुजल्यामुळे पुण्याची संस्कृती धोक्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूरात आय. टी उद्योग नकोत अशा आशयाचा एक ई-मेल पुण्यात काम करणार्‍या एका तरुणाने पाठविला होता. परंतु कोल्हापूरी कल्चर अशा भौतिक विकासामुळे नष्ट होईल असे मला वाटत नाही कारण औद्योगिक विकास साधताना सांस्कृतिक विकासासाठीही समांतर प्रयत्न शासन दरबारी होत आहेत. साहित्यिक पिंड व संवेदनशील असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी जे प्रयत्न सुरु केले आहेत त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे वाढावेत, आय. टी. उद्योग यावेत, बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी पूणे, बेंगलोर येथे कोल्हापूरचे मार्केटींग त्यांनी केले. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग सुकर व्हावा यासाठी ते शेतकर्‍यांसमवेत चर्चेसाठी बसले आणि त्यांना मान्य असलेला दर ठरवूनच ते उठले. शासन दरबारीही विमानतळ विस्तारीकरणासाठी मुबलक निधी मिळाला. विभागीय क्रीडा संकूल मंजूर झाले. तालुका स्तरावरही क्रीडा संकूले आकार घेत आहेत. यासर्व प्रयत्नाबरोबरच राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळविला. या गोष्टी करीत असताना सामाजिक जाणिवेतून त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येसारखा विषय यशस्वीपणे हाताळला. भविष्यात मुलींचे प्रमाण जर वाढले तर त्याचे श्रेय निश्चितच देशमुख साहेबांना द्यावे लागेल.
कोल्हापुराच्या सांस्कृतिक विकासातही देशमुख साहेबांनी महत्वपूर्ण कार्य केले आहे. कोल्हापूर महोत्सवाबरोबरच दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी सुरु केलेला शाहू स्मारकाचा कायापालट. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही इमारत आता तीन मजली झाली आहे. सूसज्ज ग्रंथालय, आर्ट गॅलरी, सभागृह आदी सुविधा आत नव्याने कला रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. गेली अनेक वर्ष शाहू स्मारकाच्या विकासाचा प्रश्न कोणीही बोलून दाखविला नव्हता, केवळ देशमुख साहेबांच्या दूरदृष्टीतून शाहू स्मारक नव्या स्वरुपात आकार घेत आहे. शाहू स्मारक भवन म्हणजे कला रसिकांचे मुक्त व्यासपीठ. सांस्कृतिक चळवळीचे अधिष्ठान असलेल्या या इमारतीमध्ये आता छत्रपती शाहूंना अभिप्रेत असलेली व्यासपीठे आकार घेणार आहेत. राजर्षी शाहूंनी ज्या कलांना उत्तेजन व राजाश्रय दिला त्या कलांचे व्यासपीठ याठिकाणी असणार आहे. क्रीडा क्षेत्र यामध्ये नाही कारण तेवढी जागा याठिकाणी उपलब्धही नाही. माणसाकडे जर कल्पनाशक्ती असेल तर बदल हा अपरिहार्यच असतो असे म्हटले जाते. सतत नव-नव्या कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात साकारण्याचे सामर्थ्य देशमुख साहेबांकडे आहे म्हणूनच कोल्हापूर जिल्हा आज आपली वेगळी प्रतिमा निर्माण करु लागला आहे. २६ जून या राजर्षी शाहूंच्या जन्मदिनी नव्या स्वरुपातील शाहू स्मारक भवन सर्वासाठी खुले होणार आहे. या स्मारकाच्या उभारणीत सर्व कला-रसिकांचे योगदानही तेवढेच मोठे आहे. यापुढील काळात शाहू स्मारक शहराला सांस्कृतिक विकासाची दिशा देईल यात शंका नाही. त्याची देखभाल करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. शाहू स्मारक ही एक विश्वस्त संस्था आहे. आणि ज्या शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारातून देशाला दिशा दिली. त्यांच्या विचारांचे जतन व सांस्कृतिक संवर्धनाला गती देण्याचे काम शाहू स्मारकाच्या माध्यमातून होत आहे. या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त पदावर देशमुख साहेबांनी डॉ सुनीलकुमार लवटे, डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. अशोक चौसाळकर यांची नियुक्ती करुन शाहू स्मारकाच्या कार्याला नवी दिशा दिली आहे. पुरोगामी विचारांच्या छत्रछायेत वाढलेले देशमुख साहेब तळमळीने व जाणिवेने व पुरोगामी विचारानेच काम करीत आहेत यात कसलीच शंका घेण्याचे कारण नाही. त्यांच्या कार्याला आपण पाठबळ देऊ या.


दयानंद कांबळे