सेव्ह द बेबी गर्लला द.आशिया स्तरावरचा मंथन पुरस्कार 20/12/2010


  • कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास दक्षिण आशिया स्तरावरचा प्रतिष्ठीत मंथन पुरस्कार मिळाला आहे.२०१० सालातील सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून या उपक्रमास हा पुरस्कार मिळाला आहे.नॅसकॉम, ई-इंडिया या पुरस्कारानेही सेव्ह द बेबी गर्ल उपक्रमास यापूर्वीच गौरविले आहे.मंथन पुरस्कारामुळे सेव्ह द बेबी गर्ल हा उपक्रम पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.या पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे नुकतेच करण्यात आले.
    दक्षिण आशिया स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या उपक्रमांना हा पुरस्कार देण्यात येतो.अफगानीस्तान,बांगला देश,भूतान,भारत,मालदिव,नेपाळ,श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांतील माहिती तंत्रज्ञानावर आधारित शंभरहून अधिक उपक्रम मानांकित करण्यात आले होते.ई-शिक्षण,ई-मनोरंजन,ई-पर्यटन,ई-व्यवसाय व व्यापार,ई-आरोग्य,ई-पर्यावरण,ई-विज्ञान,ई-शेती अशा वर्गवारीमध्ये राबविण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात येतो.
    सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास ई-आरोग्य (हेल्थ) या वर्गवारीमध्ये मानांकन मिळाले होते.१८ डिसेंबर २०१० रोजी नवी दिल्ली येथे एका समारंभात पुरस्काराची घोषणा करण्यात आली.ई-आरोग्य या उपक्रमांतर्गत त्रिपुरा राज्याच्या त्रिपुरा व्हिजन सेंटर या उपक्रमास मंथन पुरस्कार देण्यात आला तर सेव्ह द बेबी गर्ल या उपक्रमास सर्वोत्कृष्ट संशोधनात्मक प्रयोग म्हणून पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी स्वीकारला.

    मंथन पुरस्कार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय,नवी दिल्ली तसेच डिजीटल एम्पॉवरमेंट फौंडेशन,आयएमआय मोबाईल,मोबिलीटी फंड,इंटेल यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जातो