अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती कार्यक्रम -- परिवहन आयुक्त दिलीप जाधव



कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अंमलबजावणी कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०११ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय अािण पोलीस विभागामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त दिलीप जाधव यांनी आज दिली.
राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक यशस्वी यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, डी. टी. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्ग मदने, प्रशांत शिंदे तसेच कोल्हापूर परिवहन विभागातील सांगली व सातारा जिल्ह्यातील परिवहन अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
अपघाताचे प्रमाण कमी करण्याबरोबरच वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत, यासाठी परिवहन विभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतल्याचे सांगून श्री. जाधव म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडया, टॅक्टर ट्रेलर्स तसेच ट्रक या वाहनांतून भार क्षमतेपेक्षा तसेच धोकादायक स्थितीत ऊसाची वाहतूक करताना आढळून आल्यास अशा वाहनांवरती कडक कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या वाहनांचे अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, सिमा तपासणी नाके तसेच विविध साखर कारखान्यांच्या परिसरात वाहनांना लाल परावर्तक लावण्याची मोहीम या कालावधीत राबविण्यात येणार आहे. महामार्गावरुन चूकीच्या दिशेने येणार्‍या वाहनांवरती कारवाई करण्यात येणार आहे. भारक्षमतेपेक्षा जादा मालाची, प्रवाशांची वाहतूक न करण्याबद्दल वाहतूक व्यावसाईक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच रिक्षा युनियन प्रतिनिधी, एस.टी. चे विभाग नियंत्रक तसेच के.एम.टी. व्यवस्थापनास कळविण्यात येणार असून वाहन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या कालावधीत अशा वाहनांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन करुन वाहन चालविणार्‍या तसेच मद्य सेवन करुन चालविणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित वाहतूक नियमांची आणि चिन्हांची माहिती देण्याकरिता एन.सी.सी., एन.एस.एस. यासारख्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थामधील प्राध्यापक, स्पोर्टस्‌ प्रशिक्षक, खाजगी सुरक्षा अधिकारी, माजी सैनिक,गृह रक्षक दल, साखर कारखान्यांचे सुरक्षा अधिकारी, निवृत्त पोलीस, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी संपूर्ण वर्षामध्ये ट्रेनर्स ट्रेनिंग उपक्रम राबविण्यात येणार असून त्यांच्या सहाय्याने वाहन अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयात दर महिन्यातून एक दिवस बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असेही सांगितले.

पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी वाहतूकीत सुरळीतपणा आणण्यासाठी आयोजिलेल्या विविध उपायांची माहिती देताना सांगितले, नव वर्षाचे स्वागत करतांना वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम व शिस्त स्वयंस्फूतर्ीेने पाळल्यास अपघाताच्या प्रमाणात निश्चितच घट होईल. वाहतूकीस शिस्त लावण्याच्या दृष्टीने कोल्हापूर पोलीस विभागाने फेस बुक या सोशल वेबसाईटवर फेंडस्‌ ऑफ कोल्हापूर पोलीसची निर्मिती केली असून वाहतूकीचे नियम मोडणार्‍या वाहनांचे व्हिडीओ चित्रीकरण अथवा छायाचित्रे या वेबसाईटवर पाठविल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. मद्य प्राशन करुन वाहन चालविणार्‍या वाहन चालकांवर वाहन परवाना जप्ती तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. बाहेर गावाहून येणार्‍या पर्यटकांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना पोलीस दलाला करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रस्ता सुरक्षाअभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

सन २०११ पासून दि. १ ते ७ या कालावधीत राबविण्यात येणार्‍या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या कालावधीत वाढ करुन तो दि.१५ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. वाहनधारकांना आपल्या जुन्या वाहनाचा नोंदणी क्रमांक नवीन वाहनांवर नोंद करण्यासाठी नंबर पोर्टबिलीटी सुविधा सुरु करण्यात आली आहे. वरील तिन्ही जिल्ह्यात वाहतूकीस सुरक्षित आणि अपघात विरहित किंवा अपघातांचे प्रमाण अत्यंत कमी असलेला रस्ता आणि घाट याचा शोध घेऊन तो रस्ता किंवा घाट तयार केलेल्या अभियंत्याचा रस्ता सुरक्षा समिती मार्फत सत्कार करण्यात येणार आहे. एस.टी., के.एम.टी. रिक्षा,टॅक्सी, ट्रक या व्यवसायातील विना अपघात वाहन चालविणार्‍या चालकाचा खास प्रमाणपत्र देऊन रस्ता सुरक्षा समितीमार्फत सत्कार करण्यात येणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील कॅम्पचे ठिकाणी शिकाऊ तसेच पक्क्या लायसन्ससाठी येणार्‍या उमेदवारांना सुरक्षित वाहतूकीच्या नियमांची तसेच चिन्हांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच खाजगी वाहनातून होणारी अवैध प्रवासी वाहतूक, घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर करणार्‍या रिक्षा, भार क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणार्‍या काळी, पिवळी टॅक्सी यासारख्या वाहनांची या कालावधीत विशेष तपासणी म्हणून राबविण्यात येणार आहे.