अपंग खेळाडुंसाठी मिशन कोल्हापूर गोल्ड अपंग व्यक्तीनिर्मित वस्तुंसाठी विक्री केंद्ग उभारणार






प्रतिभावंत खेळाडुंसाठी प्रेरणादायी ठरणार्‍या कोल्हापूर मिशन गोल्ड योजनेत पॅराऑलिंपिक स्पर्धांसाठी किमान ५ अपंग खेळाडुंच्या शिक्षण,क्रिडा प्रशिक्षण व परदेश दौर्‍याकरिता विशेष तरतूद केली जाईल,तसेच अपंग व्यक्ती,विद्यार्थी व संस्थांनी तयार केलेल्या विविध वस्तुंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी विक्री केंद्ग सुरु केले जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.
५० व्या जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व चेतना अपंगमती विकास संस्थेच्यावतीने अपंगांच्या कला अविष्कारासाठी आयोजित यारे-सारे-या या चेतनामय आनंद मेळ्याच्या उद्‌घाटन प्रसंगी श्री.देशमुख बोलत होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.जे.पवार,समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे,जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे,प्राचार्य पवन खेबुडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
अपंग बांधवांसाठी आयोजित केल्या जाणार्‍या अशा आनंद मेळ्यातून एक अनोखी प्रेरणा व उमेद मिळेल.निव्वळ सहानुभूती न दर्शविता अपंगांना मेत्रीचा हात पुढे करुन त्यांना मैत्री,आस्था,प्रेम व आधार द्यावा.जिल्ह्यातील सर्व अपंगांच्या शाळा व संस्थानी एकत्रित येवून उत्तम नेटवर्क उभारले तर त्यांच्या समस्यांचे निराकरण,शासकीय मदत,नवे उपक्रम यात सुसुत्रता येईल.
अपंगांच्या अशा आनंद मेळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले,अपंगांनी केलेल्या विविध वस्तु,शैक्षणिक व कार्यालयांसाठी बनविलेली साधने यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विक्री केंद्ग उभारले जाईल.
कुलगुरु डॉ.एन.जे. पवार म्हणाले,आनंद मेळ्यातून अपंग विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहिले तर या विद्यार्थ्यांना अपंग न म्हणता विशेष अंग व विशेष क्षमता धारण केलेले विद्यार्थी म्हणणे उचित ठरेल.अशा प्रकारच्या आनंद मेळ्याचे स्वरुप विस्तृत झाल्यास अपंग विद्यार्थ्यांचे कलागुण जगापुढे येण्यास मदत होईल.
उद्योजक मोहन घाटगे यांनी समाजाने सहानुभूतीपेक्षा अपंगांना सर्व प्रकारचे पाठबळ द्यावे.विप्रो या प्रसिध्द कंपनीचे सर्वेसर्वो अझिज प्रेमजी यांनी अपंग कल्याणासाठी ८ हजार कोटींची भरीव मदत केल्याचे सांगून श्री.घाटगे यांनी जिल्ह्यातील उद्योजक व उद्योग संस्थांनी अपंग कल्याणासाठी आर्थिक पाठबळ द्यावे असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती गोपाळ कांबळे यांनी अशा प्रेरणादायीᅠकार्यक्रमांचे आयोजनासाठी सहाय्य केले जाईल असे सांगितले.समाज कल्याण अधिकारी सौ.वृषाली शिंदे यांनी अपंग कल्याणासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.प्रास्ताविकात प्राचार्य पवन खेबुडकर यांनी आनंद मेळ्याच्या आयोजनाची माहिती देवून अपंगांच्या समस्यांचा आढावा घेतला.
प्रा.पवन खेबुडकर लिखित यारे-सारे-या या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला.ज्ञान प्रबोधन अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.यावेळी मूकबधीर शाळा तिळवणीच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला रंगीला,सन्मति मतिमंद मुलांची शाळा,इचलकरंजीच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ तर वि.म.लोहिया मूक बधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्‌ गीतावर आकर्षक नृत्य करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
यावेळी पॅराऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या मंजिरी कुलकर्णी-(सायकल स्पर्धा) केदार देसाई-(पॉवर लिफ्टींग),रोहित पांढरे (रोलर स्केटिंग) या अपंग खेळाडुंचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अंधविद्यार्थीनी कु.सुनिता सनदी,कर्णबधिर विद्यार्थीनी कु.ज्योती कांबळे,अपंग विद्यार्थी वैभव जोगळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील विविध अपंग शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सकाळी ९ वाजता रन फॉर डिसॅबिलीटी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.लकी बाजार येथून मॅरॅथॉनला प्रारंभ झाला.राजारामपुरी,जनता बझार,फोर्ड कॉर्नर,बिंदू चौक मार्गे जाऊन प्रायव्हेट हायस्कूल येथे मॅरॅथॉनची सांगता झाली.मॅरेथॉन स्पर्धेत तिळवणीच्या रोटरी कर्ण बधिर विद्यालयाच्या वैभव जाधव याने प्रथम तर याच विद्यालयाचा अरुण रावळ याने द्वितीय आणि कोल्हापुरच्या बाल कल्याण संकुलच्या अजित पाटील याने तृतीय क्रमांक पटकाविला.मुलींमध्ये वि.म.लोहिया मुक बधिर विद्यालयाची श्रध्दा जमादार हिने प्रथम,उषाराजे हायस्कूलच्या प्रियांका चव्हाण हिने द्वितीय तर याच हायस्कूलच्या निकिता गवळी हिने तृतीय क्रमांक पटकाविला.दि.३ ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार्‍या आनंद मेळाच्या निमित्ताने अपंगांनी बनविलेल्या विविध गृहपयोगी व कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.फनफेअर,पपेट शो,मॅजिक शो,कलाविष्कार आणि विविध खाद्य पदार्थाचें स्टॉलस्‌ आनंद मेळाचे आकर्षण ठरले आहे.
आनंद मेळ्यास जिल्हयातील विविध अपंग व मूक बधिर शाळा,अपंग कल्याण संस्था,अपंग विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सोनाली नवांगूळ तर आभार दिलीप बापट यांनी केले.