क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मार्च अखेर पूर्ण करावीत-जिल्हाधिकारी




विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा दर्जा उत्तम आणि दर्जेदार राखून पहिल्या टप्प्यातील कामे मार्च २०१० अखेर पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज आढावा बैठकीत दिल्या.
विभागीय क्रीडा संकूल समितीच्यावतीने क्रीडा संकूल बांधकामाच्या कार्यस्थळी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस क्रीडा संचालक नरेंद्ग सोपल,महापालिका उपायुक्त ओमप्रकाश दिवटे,क्रीडा उपसंचालक नरेंद्ग देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रीडा संकुलाच्या बांधकामाबाबत आढावा घेऊन पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले,क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यात जलतरण तलाव,लॉन टेनीस कोर्ट,अ‍ॅथलेटिक ट्रॅक,फुटबॉल मैदान आणि अंतर्गत रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेतांना या कामांचा दर्जा उत्तम राहील याची संबंधितांनी योग्य ती दक्षता घ्यावी.कोल्हापुरातील नेमबाजांनी राष्ट्रकुल स्पर्धेबरोबरच देशांतर्गत झालेल्या स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी पार पाडल्याने पहिल्या टप्प्यामध्ये शुटिंग रेंजची उभारणी करण्यात येत आहे.यामध्ये १० मीटर,२५ मीटर व ५० मीटरची अद्ययावत अशी शुटिंग रेंज निर्माण करण्यात येत असून १० मीटर शुटिंग रेंजसाठी इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड या ठिकाणी बसविण्यात येईल.
फुटबॉल मैदानाच्या सभोवती संरक्षक भिंत व प्रेक्षक गॅलरीची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सांगून श्री.देशमुख म्हणाले,कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.क्रीडा संकुलाचा दर्जा वेळोवेळी तपासण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या संमतीने क्रीडा तज्ञांची समिती निश्चित करण्यात येईल.वास्तुविशारद,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व बांधकाम कंत्राटदार यांनी समन्वयाने क्रीडा संकुलाच्या कामाचा पाठपुरावा करावा अशा सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी बैठकीत दिल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय क्रीडा संकुल समिती समवेत क्रीडा संकुलाच्या बांधकामाची पाहणी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप शेलार,डीआरडीएचे प्रकल्प संचालक डॉ.प्रमोद शिंदे,जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्ग घाडगे,क्रीडा अधिकारी अरुण पाटील,वास्तुविशारद प्रमोद पारेख,बांधकाम कंत्राटदार सारंग जगताप,विजय सासने उपस्थित होते