कोल्हापूरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असतानाही बंदी गजानन खडके यांनी आपल्या लेखनशैलीतून स्वतःचे वेगळेपण दाखवून दिले आहे हुपरी येथील श्री साई बहूउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या हुपरी लेखणी सम्राट -२०१० या राज्यस्तरीय खुल्या गटातील निबंध स्पर्धेत श्री. खडके यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
हातून घडलेल्या गुन्हयांमुळे कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाही गजानन बाळासाहेब खडके यांनी आपली लेखन कला सुरु ठेवली आहे. हुपरी लेखणी सम्राट या स्पर्धेसाठी त्यांनी ' फॅशनचे वाढते स्वरुप व भारतीय संस्कृती ' या विषयावर निबंध सादर केला होता. संस्थेतर्फे त्यांना रोख १ हजार ५०० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कळंबा कारागृहाचे अधीक्षक जे. एस. नाईक यांनी खडके यांचे पुणे येथील अप्पर पोलीस महासंचालक, (कारागृह) संजयकुमार वर्मा यांच्यातर्फे अभिनंदन केले व लेखन कलेस चालना दिली. कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी एम.एन.कांबळे, डी.जी. गावडे तसेच शिक्षक एस.आर.जाधव व एच.बी.बिराजदार यांनी गजानन खडके यांना मार्गदर्शन केले